रविवार, २७ जून, २०१०

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे - ना. धों. महानोर ('रानातल्या कविता' ह्या काव्यसंग्रहातून )

महानोरांचा रानाशी एक गहिरा संबध होता... एक नाते होते... त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर

ह्या शेताने लळा लाविला असा की
सुख दुःखाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...



त्यांचे रानावर अतोनात प्रेम होते आणि रानाचेही त्यांच्यावर प्रेम होते... ते रानाशीच त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टी बोलतात... रानही त्यांच्याशी बोलत असावे कारण त्यांना रानाच्या संवेदना जाणवल्याचे दिसते....

महानोरांनी निसर्गाला एक शक्ती न मानता, त्याला देह दिला आहे; त्याचे अनुभव व संवेदना यांचे दर्शन त्यांना देहाच्या माध्यमातून घडले आहे. हा निसर्ग देहधारी असल्यामुळे तो प्रतिमित होणे हेही अधिक सुकर झाले आहे. महानोनारणी त्याचे केवळ चेतानीकरण न करता, त्याला एक स्वयंपूर्ण अस्तित्वच दिले आहे....

त्यांचे रानाशी झालेले सायुज्य शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही स्वरूपाचे आहे. तोच महानोरांचा संपूर्ण अनुभव आहे. त्यांना या अनुभावापुढे इतर सगळे दुय्यम वाटते. रान हे त्यांचे ध्यान, त्यांचा साक्षात्कार. एकदा हा साक्षात्कार झाला की नभ आणि भुई यांच्यातील भावबंध जाणवू लागतो. डोळे भरून येतात. जीव तेथेच गुंतून राहतो.
विजया राजाध्यक्षांच्या 'ना. धों. महानोर यांची कविता' ह्या लेखामधून....


ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोन्धाल्याला चांदणे लखडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेह्श होता
शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!

रविवार, २० जून, २०१०

चुका - सुधीर मोघे ( 'पक्षांचे ठसे' ह्या काव्यसंग्रहातून)


क्षणोक्षणी चुका घडतात
आणि श्रेय हरवून बसतात

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवीत असतात

कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते

चूक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायचीच नसते

एक कृती, एक शब्द
एकाच निमिष युकत-हुकत

उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं

अखेर हे सारं घडतं
केवळ आपण काही शिकवण्यासाठी

आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!

आधार - सुधीर मोघे ( 'पक्षांचे ठसे' ह्या काव्यसंग्रहातून)

सुधीर मोघ्यांच्या काही कविता अतिशय भावनाप्रधान, हळव्या, नाजूक, उत्कट आणि प्रेमळ आहेत तर काही कवितांमध्ये एक सात्विक, भाविक, आणि आत्मिक अविष्कार आढळतो. कधी त्यांची कविता बेदरकार, धीट असते तर कधी घायाळ आणि निराश... हि एक अशीच विचार करण्यासारखी कविता....

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो
तो खरोखर आधार असतो का?
गडद अंधारातून आपण प्रकाशात येताना
एकटेच येतो
पुन्हा काळोखात विरताना सुद्धा
हा एकटेपणाच आपली सोबत करतो
मग, ह्या उजेडातल्या प्रवासातच हि वेडी तहान का?
तिच्यावाचून असहाय्य व्हावं
इतकी तिची मिजास का?
ज्यांचा आधार शोधायचा ते तरी कुठे समर्थ असतात?
खरं म्हणजे ते देखील आपल्यासाखेच
उजेडात चाचपडत असतात.
तरीही त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते
गंमत म्हणजे, आपल्या खांद्यावरही
कुणाची मान विसावू पाहते
अखेर आधार ह्या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?
जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का?

शनिवार, १९ जून, २०१०

पक्षांचे ठसे - सुधीर मोघे ( 'पक्षांचे ठसे' ह्या काव्यसंग्रहातून)

सुधीर मोघ्यांच्या कवितेशी माझी ओळख झाली ती त्यांच्या 'पक्षांचे ठसे' ह्या कवितेमुळे माझे कॉलेज नुकतेच संपले होते. पूर्वी सतत ज्या मित्र मैत्रिणीच्या गराड्यात दिवस जायचा ते आम्ही सर्व आपापल्या नोकरी-धंद्यात व्यग्र झालो. पण त्या मुक्त, मुग्ध, आशावादी, सोनेरी दिवसांच्या आठवणी मनात ताज्या होत्या आणि त्याच सुमारास हि कविता माझ्या वाचनात आली आणि मनात घर करून गेली....


कुठून कुठून येतात पक्षी
आणि आभाळ भरून जातं
सोनेरी नादांची भरजरी नक्षी
आभाळ दिमाखात मिरवीत रहातं

त्या पक्षांना न नाव-गावं
रेषांत गवसणार रूपही नसतं
रंगाचा, स्वरांचा धूसर कल्लोळ
एवढंच त्यांचं अस्तित्व भासतं

क्षणाच्या संगतीची जीवघेणी भूल
कण-कण व्यापून टाकते
एरवीची सावध शहाणी जाण
खुळ्या आवर्तात विरघळून जाते

स्वप्नात स्वप्न दिसावं तसं
क्षणात सारं घडतं, संपतं
खिन्न, रित्या प्राणांनी आभाळ
तोल तोल सांभाळत रहातं

शनिवार, १२ जून, २०१०

कधी वाटतं - निवेदिता पटवर्धन

कितीतरी मोठ्या मोठ्या कवींच्या किती तरी छान छान कवितांची नोंद अजून बाकी असताना मी माझीच कविता निवडण्याचे कारण म्हणजे हा शुक्रवार-शनिवार इतके कार्यक्रम होते कि फार काही लिहायला वेळच नव्हता. पण आता दर शनिवारी एका कवितेची नोंद करायचीच असे ठरवले असल्यामुळे माझीच कविता निवडली.

माझ्या एका मैत्रिणीच्या म्हणजे चित्रा भावेच्या भावाने म्हणजे डॉ. भूषण केळकरने अनिवासी भारतीयांच्या कवितांचा 'निवडक तीन' असा एक कवितासंग्रह प्रकाशित केला होता. त्यात माझ्याही तीन कवितांची निवड झाली होती. हि कविता त्यातलीच एक...

कधी वाटतं पाण्यासारखं व्हावं
मिळेल त्या रंगत मिसळून जावं
प्रसंगी बर्फ होऊन खंबीर बनावं
तर कधी वाफेसारखं सर्वांत सामावून जावं!

कधी वाटतं हवेसारखं व्हावं
सर्व व्योमात व्यापून उरावं
मोजमाप सोडून अनमोल व्हावं
अनमोल होऊनही बिनमोलात उपलब्ध व्हावं!

कधी वाटतं आकाशासारखा व्हावं
सर्वांवर प्रेमाचं पांघरूण घालावं
विजेसारखं चमकून धाकात ठेवावं
पाऊस होऊन कधी मायेने बरसावं!

शनिवार, ५ जून, २०१०

अनामी कवीची निनावी कविता

मला अगदी शाळा-कॉलेज मध्ये असल्यापासून कवितांची आवड होती. तेव्हा मी एक वही केली होती. तिला 'मुक्तविचारधारा' असे नाव हि दिले होते. कुठेही काही चांगले वाचले कि मी ह्या वहीत त्याची नोंद करून ठेवायचे. पण कधी कधी त्याबरोबर बाकीचे संदर्भ नाही लिहिले गेले... त्यामुळे हि कविता मला कुठे मिळाली, ती कोणाची आहे हे काहीही मला माहिती नाहीये... (कोणाला जर त्याबद्दल काही माहिती असेल तर कृपया मला कळवावे. )


हि कविता मला खूपच आवडते. सगळ्यात आवडती ओळ शेवटची.

प्रत्येकाची गती निराळी
प्रत्येकाचा पण तालहि तोच
प्रत्येकाचा नाजूक नखरा,
प्रत्येकाचा गहिरा खोच,
प्रत्येकाची रीत निराळी,
प्रत्येकाचे वळणही न्यारे,
प्रत्येकाने, प्रत्येकाच्या प्रत्येकातून जावे कारे?


किती खरं आहे हे... कितीही जवळचे व रक्ताचे नाते असले तरी प्रत्येकाचे स्वतःचे असे एक विश्व असतेच आणि ते असावेही...