रविवार, १० ऑक्टोबर, २०१०

बा. भ. बोरकर

क्षितिजी आले भरते गं
घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर
झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते गं !
लाजण झाली धरती गं
साजण काठावरती गं
उन्हात पान
मनात गान
ओलावून थरथरते गं !
नाते अपुले न्हाते गं
होऊन ऋतूरस गाते गं
तृणात मोती
जळात ज्योती
लावीत आले परते गं !

बा. भ. बोरकर (चित्रवीणा ह्या काव्यसंग्रहातून)

हिरवळ आणिक पाणी
तेथे स्फुरती मजला गाणी
निळीतून पांखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी ||
सुखांत चरती गुरेवासरे
लवेतूनी लहरते कापरे
हवेतुनी आरोग्य खेळते गार नि आरसपानी ||
उरी जिथे भूमीची माया
उन्हात घाली हिरवी छाया
सांडीत कोमल आनंदाचे पाझर पानोपानी ||
जिथे अशी समृद्ध धरित्री
घुमती घरे आणि पुत्रकलत्री
रमे श्रमश्री माहेरींच्या स्वाभाविक लावण्यी ||
सख्यापरते जिथे न बंधन
स्मितांत शरदांचे आमंत्रण
सहजोद्वारी गाढ चांदणे, स्पर्शी स्नेह हिमानी ||
ऋतूऋतुंतून जिथे सोहळे
तसेच उघड्यावरी मोकळे
आणि अंगणी शृंगाराची निर्मळ अमृतवाणी ||
माणूस जेथे हवाहवासा
अभंग-ओवीमध्ये दिलासा
विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी ||
देव जिथे हृदयात सदाचा
भार मनाला नसे उद्यांचा
सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दुःखे डोळा पाणी ||

रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

सांगता - अनु आमलेकर

काही का घडेना, घडते तर आहे
घडणे जेव्हा थांबेल, तेव्हा सर्व संपलेले असेल
अज्ञानाच्या ढिगाऱ्यात मीच मला शोधते आहे
हा शोध तेव्हाच सरेल, जेव्हा सर्व संपलेले असेल,
माझ्या अस्तित्वाचे काही प्रयोजन असेल
विध्यात्याचा त्यात काही हेतूही असेल
पण जेव्हा हे कारणच नसेल, तेव्हा सर्व संपलेले असेल,
रासायनिक प्रक्रिया किंवा विधीचे नाटक असेल
प्रयोग एकदा उरकला कि सर्व संपलेले असेल
धरती दुभंगेल, महाप्रलयहि कदाचित होतील
माझ्याकरता मात्र आधीच, हे सर्व संपलेले असेल
कुणी हळू कुजबुजतील, कुणी मुक्त हसतील
क्वचित कुणी विचारही करतील, जेव्हा सर्व संपलेले असेल
मनाला सारखा प्रश्न पडतो, तुम्हालाही पडत असेल
खरंच का शेवटी असे सगळे सगळे संपत असेल?
गेल्यानंतर यावे लागेल? पुन्हा चक्र सुरु होईल?
कि परत कधीच यायचे नाही? सर्व काही संपले असेल
जागून उत्तर शोधताना, कधी अचानक वाटते
सीमेपलीकडील कुणी भेटेल
दिलखुलासपणे हसत म्हणेल, खुशाल झोपी जा तू
हे खरंच सर्व संपलेले असेल!

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

मी - शांता शेळके

खालील कवितेचे नाव मला खर तर माहित नाहीये पण मला असे वाटले कि ह्या कवितेचे नाव 'मी' असू शकते. शिवाय हि कोणत्या काव्यसंग्रहातील कविता आहे ह्याची नोंद माझ्याकडे नाहीये... कोणाला जर ह्या कवितेचे खरे नाव व काव्यसंग्रहाचे नाव माहिती असेल तर मला जरूर कळवावे म्हणजे मी ते नोंद करू शकेन...

मी केव्हा गर्दीतून जीवाला सांभाळत जाणारी
मी केव्हा गर्दीतही आत्यंतिक एकाकी होणारी
मी बघते आत्मतुष्ट लोक किती भवताली वावरती
चुकताही धूर्तपणे आपलेच आपणास सावरती

वावदूक विद्वता, शब्दांची हुन्नर वा चतुराई
मजपाशी यामधले काहीही काहीही मुळी नाही
मी-तू चा तू-मी चा घोष असा अव्याहत कानावर
वरवरची बेहोशी आतून हे छान परी भानावर

मुखवट्यात वरच्या या मुखवटेच आत पुन्हा दडलेले
झडलेले पीस पीस... सत्य इथे मरगळून पडलेले
या लाटा कोसळती फेकुनिया देती मज दूर दूर
वाळूवर मी, आणिक घोंघावत शेजारी उग्र धूर

मी मजला न्याहाळीते, माझ्यातून अलग अशी होते मी.
निष्कलंक शुभ्र फुले देहावर ओढुनिया घेते मी.


दुःख - शांता शेळके ( गोंदण ह्या काव्यसंग्रहातून)

दुःख समंजस माझे
नाही फिरवली द्वाही
कधी आले आणि गेले
मला कळलेही नाही!

मला कळले हि नाही
उरे पुसटशी खुण
... फक्त फिकट चांदणे
... फक्त मंदावते उन

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

'कसे' आणि 'मन माझे' - निवेदिता पटवर्धन

आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी संघ होता. त्याच्यातर्फे आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवायचो. त्यातच काही सामाजिक कामेहि करायचो... आमच्या आसपासच्या लोकांकडून जुने कपडे, पुस्तके गोळा करायचो... डॉक्टरांकडून free samples गोळा करायचो आणि ते सर्व येऊरला म्हणजे ठाण्याजवळच्या गावात जाऊन तिथल्या लोकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना नेऊन द्यायचो... त्या निमित्ताने आपल्या घराच्या सुरक्षित आणि सुखसोयींपलीकडे खरं जग किती कठीण असू शकतं हे कळलं.... college मध्ये समाजवाद शिकत होतो... शिवाय ते दिवस हि खूप उमेदीचे, आशावादाचे, काही तरी करण्याच्या उत्साहाचे होते... खालील दोन कविता ह्या माझ्या त्या दिवसातल्या मानसिक विश्वाची झलक दाखवतात... आता खर तर वाचूनहि पहिल्यांदा उदास वाटलं कि अरे ह्यातलं काहीच करायला जमलं नाही... पण नंतर परत मनाला समजावलं... अजून बरंच काही आपल्या हाती आहे... अजूनही वेळ गेलेली नाही... मग परत जरा मनाला उभारी आली....

पहिल्या कवितेत सैरभैर झालेल्या व बाहेरच्या विश्वातले प्रखर सत्य पाहून भांबावलेल्या माझ्या मनाला पडलेले प्रश्न आहेत. तर दुसऱ्या कवितेत माझी द्विधा दिसते.. एकीकडे तर तरुणपणातली एक सहज आणि स्वाभाविक स्वप्नचित्र खुणावत होती तर दुसरीकडे चाकोरीतल्या जीवनापलीकडे जाऊन काहीतरी करण्याची तडप होती...

कसे -

सुखाशिवाय दुःख लोक झेलतात तरी कसे?
दुःखभरल्या या जगात लोक सुखावतात तरी कसे?
सत्यापासून दूर लोक स्वप्नात रमतात तरी कसे?
अशाश्वताच्या सत्यास लोक विसरतात तरी कसे?

प्रेमापासून दूर लोक भांडतात तरी कसे?
मायेशिवाय बाल्य इथे फुलतेच तरी कसे?
निराधारांना आधार इथे मिळणार तरी कसे?
स्वतःपुरता विचार सोडायला लोक शिकणार तरी कसे?

वर्तमानात अंधकार लोक जगतात तरी कसे?
भविष्यही नाही साकार, लोक निष्काळजी कसे?
मन माझे निराधार, कळेना आधार लोकांचे कसे?
शोधे शांती निराकार, शक्य करावे हे कसे?

सारेच कसे मी उमजणार तर कसे?
समजून उमजून हि वळते कधी न कसे?
नाही! मला मात्र नाही हे असे जगायचे...
पण...
पण कुणास ठाऊक मलाही जगावे लागणार आहे कसे?





मन माझे


मन माझे वेडे सदा अशांतीतच रमे
खुणावेल जो कोणी त्या मागे पळते

कधी रमते रम्य स्वप्नचीत्रात
राजा आणि राणी नाही कशाची ददात
सुखामागे पळे बापुडे दुःखालाही स्वीकारत
मन माझे वेडे, शोधे अर्थ सगळ्यात

कधी होई कासावीस, वाटे निराधार
सगळेच होई निरर्थक आणि निराकार
सुखाची नसे चिंता होई दुःखावर स्वर
मन माझे वेडे, नाही दुःखही साकार

कधी रमते भविष्याच्या सुखस्वप्नात
ग्रासते कधी वर्तमानाच्या विवंचनात
भांबावते भूतकाळाच्या आठवणीत केव्हा
मन माझे वेडे, न जाणो स्थिरावेल केव्हा

लोक जगतात तरी का आणि कसे
मी तरी जगते कशी आणि का
उत्तरे मिळूनही अनुत्तरीतच हे कोडे
मन माझे वेडे, शोधे कोठे उत्तर का सापडे....

शनिवार, ३१ जुलै, २०१०

चाहूल - समीर करंदीकर ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

तुझ्या थोडयाश्या हास्यात
तुझा आनंद मावेना
त्याची चाहूल लागली
तुझा श्वासही ठरेना

आता येणार सानुल्या
जाईजुईला बहर
स्वप्नं पुनवेच पडे
उगवली चंद्रकोर

भासे शब्दांत काळजी
मिटे पापणी उत्सुक
गर्भ-रेशमी पदरी
नव्या पालवीचे सुख

एका छोट्या स्पंदनाने
सारा आनंद गावला
तुझ्या-माझ्या जगण्याला
आता.... नवा अर्थ आला

नातं - शिल्पा केळकर ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

तशी तिची-माझी ओळख जन्मांतरीची
तिचा निर्व्याज-निष्पाप चेहराही माझा
तिचा खट्याळ-खोडकरपणा आणि
तिच्या बुद्धीमत्वाची चमकही जणू
माझ्याच मालकीची...
आता मात्र तिची मला ओळख पटते आहे
आणि तिच्या नजरेत परकेपणाही जाणवतो आहे,
माझ्यापासून वेगळे होऊ पाहणारे
माझेच 'अस्तित्व'
जणू काही माझी मलाच
नव्याने ओळख करून देते आहे!

निरोप - योगेश फडणीस ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

अर्धवट बहर अबोलीचा
अर्ध्यात थांबला झोका
चिंब पावसात एकत्र भिजूनही
तू कसा राहिलास कोरडा.....

मळवट भरला उगवतीचा
वाटेतच थांबला पहाटवारा
एकत्र स्वप्नं रंगवताना
तू कसा मिटलास डोळा....

रिकाम्या ओंजळीचा हात आपला
कंदिलाच्या प्रकाशाने उजळला
दारासमोरच्या सुंदर रांगोळीत
राखेचा रंग का भरलास...

आता प्रवास उरला एकटीचा
पण त्यालाही नसे काही दिशा
मध्यान्हीची उन्हंही उतरली
सावलीसारखा तू रे का दुरावला....

शनिवार, २४ जुलै, २०१०

राधा - सुजाता भिडे ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

रागावणार होती ती त्या काळ्या नभावर
अवेळीच बरसल्याबद्दल
पण तेवढ्यात सुगंध पसरला मातीचा,
अन त्या नभावरच मन जडलं तिचं!

रुसणार होती ती त्या रिमझिम धारांवर
तीन्हीसंजेचा सोनेरीपणा घालवल्याबद्दल -
पण तेवढ्यात फुलून आलं इंद्रधनुष्य,
अन त्या धारांवरच प्रेम बसलं तिचं!

ती नाराजच होती त्या सांजवेळेवर
उगीचच हुरहूर लावल्याबद्दल -
पण तेवढ्यात बासरी घुमली आसमंतात,
अन सोनं झालं तिच्या संध्याकाळीच!!

आशा - सुजाता भिडे ( 'निवडक तीन' ह्या काव्यसंग्रहातून)

त्या अक्राळविक्राळ वृक्षांच्या
अभेद्य तटबंदीमध्ये -
तो काळाशार डोह एकटाच पसरला होता,
म्लान, श्रांत, एकाकी...
सूर्योदय होऊ घातला होता का?
कि आता रात्रीची सुरवात?

डोह वाट पाहत होता - वर्षानुवर्ष
एखादी चाहूल,
एखादी पक्ष्याची लकेर,
निदान एखादा तरंग - त्याचं अंग मोहरून टाकणारा...
पण काळ जणू थांबून गेला होता.
त्या विचारांनी डोह आणखीच काळवंडला,
निराश झाला!
पुन्हा एकदा आक्रसून जाताना
अचानक त्याच्या नजरेत आलं
ते इवलंसं रोपटं -

कशालाही न जुमानता, उन्हाचा एक धीट कवडसा
त्या वृक्षांना भेदून खाली आलं होता,
त्या रोपट्याला कवटाळू पाहत होता -
आणि रोपटं दिमाखात डोलत होतं
वृक्षांच्या नजरेला नजर देत

डोह सुखावला...
ती काळरात्र नव्हती,
सूर्य अजून जागा होता!!!

शनिवार, १७ जुलै, २०१०

सुधीर मोघ्याच्या 'लय' ह्या काव्यसंग्रहातून

ही दरी
धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ
उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर
पाय दवाचे... ओले...


मी ओंजळ माझी
रितीच घेऊन आलो
जाताना...
ओंजळ रितीच ठेवून गेलो
ओंजळीत आल्या गेल्या श्रेयांवरती
पण... पुसट... कोवळे
नाव कोरूनी गेलो....


न सांगताच तू
मला उमगते सारे
कळतात तुलाही
मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध
'कळण्याचा' चाले
'कळण्याशी' संवाद...


मी तुझ्या घराशी
खरेच होतो आलो
थबकलो... जरासा....
क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडूनी धागे
क्षण वळून पहिले....
.... तुझा उंबरा मागे!



वठलेल्या फांद्या होत्या
परवा... परवा...
आभाळ कोरडे होते
परवा... परवा...
नादला एकदा आषाढाचा 'झाला'
झाडांतून हिरवा
पाऊस दाटून आला


शेवटी भेटलो होतो
आपण येथे
ह्या इथेच वळले
दुरावणारे रस्ते
तेव्हा मी फिरलो इथेच येता येता
पण आज थबकलो येथे...
जाता.... जाता...


तू वेध घेतला
आणि साधला नेम
ह्या क्षणापूर्वी तर
होते सारे क्षेम
झाले ते झाले.... एक कळेना फक्त
का तुझ्याही कालाजातुनी झिरपते रक्त?


आकाश तरंगे
उंचावरती दूर
मातीच्या हृदयी
झुरणीचे काहूर
जाणून घेउनी अतृप्तांचे हेतू
कोसळता पाऊस
झाला मिलनसेतू

शनिवार, १० जुलै, २०१०

अंतरंग - हेमा लेले (अंतरंग काव्यसंग्रहातून)

कधी शोधला स्वप्नगंध... कधी वास्तवाचा रंग!
कधी झाले निःसंग... कधी केला असंगाशी संग...
कधी पुरती रंगले तर कधी फक्त तरंगले!
अंतर्यामीचा षड्ज मात्र नेहमीच जपत आले.
... माझ्या नकळत... पावलोपावली माझेच अंतरंग वेचीत गेले...

हेमा लेले (अंतरंग काव्यसंग्रहातून)

आयुष्य ओळखीचे माझ्या कधीच नव्हते
तरीही बघाल तेव्हा जगण्यात मग्न होते!
नभ शुष्क पोळलेले मौनांत स्तब्ध होते...
तरीही बघाल तेव्हा घनचींब न्हात होते.
जनरीत सांगणारे वारे उजाड होते...
तरीही म्हणाल तेव्हा बहरून येत होते...
जवळीक सांगणारे विषपात्र देत होते!
प्राशून ते कितीदा मी 'कृष्ण!' म्हणत होते...
निमिषात 'तो' ही आला! हातात हात होते!
भरल्या सुखात झुरणे माझे तरी न टळते...

रंग - हेमा लेले (अंतरंग काव्यसंग्रहातून)

आनंदाचा रंग
डोहात तरंग
मन कसे नाचते रे
होऊनी अनंग!

कमळाची मिठी
पाकळ्यांचे गात्र!
खोलवर शोधू या रे
प्रीतीचा 'श्री' रंग

विषयाची गोडी!
नव्हे! ब्रम्हानंदी टाळी...
डोहाच्या पाण्याला की रे
मोक्षाचा तरंग...

प्रिय - हेमा लेले ( प्रिय ह्या काव्यसंग्रहातून)

- प्रेम म्हणजे रे काय?
आयुष्य जगण्यासाठी जडवून घ्यावा लागतो असा छंद!
- नातं म्हणजे रे काय?
जे असूनही जाणवणार नाही असं!
- दिसणं म्हणजे रे काय?
जे बघितल्यावाचून कळत असं!
- गुंतून जाण म्हणजे रे काय?
जे स्वातंत्र्याच्या उंबरठ्याशी नेतं असं!
- सर्वस्व म्हणजे रे काय?
जे लुटल्यावरच आपण श्रीमंत होतो असं!
- वेडावण म्हणजे रे काय?
शहाणपणाची झींग उतरवत असं!
-आपलं म्हणजे रे काय?
जे दुरूनही दिलासा देतं असं!

शनिवार, ३ जुलै, २०१०

उरली केवळ - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)



अशीच कधी मी रमले होते
तुडुंबलेल्या चंद्रामध्ये,
चंद्रावरुनी तरंगणाऱ्या
इवल्याइवल्या मेघांमध्ये
माझ्यामध्ये.

डिवचून गेले तोच कुणी तो
क्षणैक हलली
काळी छाया
तिमिराच्या वाऱ्यावर.

तेव्हापासून अखंड आहे जागी.
भिरभिर डोळे
बुडे बाहुली त्या छायेमधी.

थरथर स्पर्शांचे संवेदन
त्या स्पर्शाच्या तुकड्याभवती.


वेदना - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)


डोळ्यामधले रक्त थिजावे
ओठहि व्हावे हिरवेकले
आणि गिळावया
लाख वेदना.

ज्या लाखांच्या अंगांगावर
फुटती
फडा उग्रशा, उफाडणाऱ्या
निवडुंगाच्या.

नुरते तेव्हा
माझें... माझें..... मीपण,
नुरती पुढले बेत आणखी
मागील काही आठवण,
नुरते तेव्हा दुखःहि
सांगायचे कण्हून.....

सहस्त्राक्ष त्या फणीफणीला
दिसते एकच :
अंग चोरुनी आहे सरकत
वरती वरती
भयाकूल नभ.

'नभांत उरले...' - इंदिरा संत (मृगजळ ह्या काव्यसंग्रहातून)

बा. सी. मर्ढेकर, विं. दा. करंदीकर ह्यांच्या बरोबरच नवकवींमध्ये गणल्या गेलेल्या इंदिरा संत... जन्म - १९१४. ठिकाण -बेळगाव.

त्यांच्या बराचश्या कविता ह्या त्यांच्या भावविश्वातून प्रकट होतात. त्यात एक तडप आहे, दुःख आहे, विरह आहे, ओढ आहे... बहुतांशी त्यांच्या कवितेचा गाभा प्रेम वा निसर्ग आहे. छंद, यमक, रूपक असल्या चाकोरीबाहेरची मुक्त आणि स्पष्ट कविता आहे त्यांची.


जळराशीची ओढ अनावर
हवीच जर का तुला कळाया,
हवेच व्हाया तुजला वाळू
कणाकणाने... तसे झिजाया.

-- पुण्य न तितुके असते गाठी
शापायला तुला तसे पण;
ओघ गोठला जळराशींतील
नभांत उरले फक्त निळेपण!

रविवार, २७ जून, २०१०

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे - ना. धों. महानोर ('रानातल्या कविता' ह्या काव्यसंग्रहातून )

महानोरांचा रानाशी एक गहिरा संबध होता... एक नाते होते... त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर

ह्या शेताने लळा लाविला असा की
सुख दुःखाला परस्परांशी हसलो-रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो...



त्यांचे रानावर अतोनात प्रेम होते आणि रानाचेही त्यांच्यावर प्रेम होते... ते रानाशीच त्यांच्या सुख दुःखाच्या गोष्टी बोलतात... रानही त्यांच्याशी बोलत असावे कारण त्यांना रानाच्या संवेदना जाणवल्याचे दिसते....

महानोरांनी निसर्गाला एक शक्ती न मानता, त्याला देह दिला आहे; त्याचे अनुभव व संवेदना यांचे दर्शन त्यांना देहाच्या माध्यमातून घडले आहे. हा निसर्ग देहधारी असल्यामुळे तो प्रतिमित होणे हेही अधिक सुकर झाले आहे. महानोनारणी त्याचे केवळ चेतानीकरण न करता, त्याला एक स्वयंपूर्ण अस्तित्वच दिले आहे....

त्यांचे रानाशी झालेले सायुज्य शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही स्वरूपाचे आहे. तोच महानोरांचा संपूर्ण अनुभव आहे. त्यांना या अनुभावापुढे इतर सगळे दुय्यम वाटते. रान हे त्यांचे ध्यान, त्यांचा साक्षात्कार. एकदा हा साक्षात्कार झाला की नभ आणि भुई यांच्यातील भावबंध जाणवू लागतो. डोळे भरून येतात. जीव तेथेच गुंतून राहतो.
विजया राजाध्यक्षांच्या 'ना. धों. महानोर यांची कविता' ह्या लेखामधून....


ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोन्धाल्याला चांदणे लखडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेह्श होता
शब्दगंधे, तू मला बहुत घ्यावे!

रविवार, २० जून, २०१०

चुका - सुधीर मोघे ( 'पक्षांचे ठसे' ह्या काव्यसंग्रहातून)


क्षणोक्षणी चुका घडतात
आणि श्रेय हरवून बसतात

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवीत असतात

कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते

चूक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायचीच नसते

एक कृती, एक शब्द
एकाच निमिष युकत-हुकत

उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं

अखेर हे सारं घडतं
केवळ आपण काही शिकवण्यासाठी

आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!

आधार - सुधीर मोघे ( 'पक्षांचे ठसे' ह्या काव्यसंग्रहातून)

सुधीर मोघ्यांच्या काही कविता अतिशय भावनाप्रधान, हळव्या, नाजूक, उत्कट आणि प्रेमळ आहेत तर काही कवितांमध्ये एक सात्विक, भाविक, आणि आत्मिक अविष्कार आढळतो. कधी त्यांची कविता बेदरकार, धीट असते तर कधी घायाळ आणि निराश... हि एक अशीच विचार करण्यासारखी कविता....

जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का?
आपण ज्याला आधार मानतो
तो खरोखर आधार असतो का?
गडद अंधारातून आपण प्रकाशात येताना
एकटेच येतो
पुन्हा काळोखात विरताना सुद्धा
हा एकटेपणाच आपली सोबत करतो
मग, ह्या उजेडातल्या प्रवासातच हि वेडी तहान का?
तिच्यावाचून असहाय्य व्हावं
इतकी तिची मिजास का?
ज्यांचा आधार शोधायचा ते तरी कुठे समर्थ असतात?
खरं म्हणजे ते देखील आपल्यासाखेच
उजेडात चाचपडत असतात.
तरीही त्यांच्या हाताची ऊब आपल्याला का हवी असते
गंमत म्हणजे, आपल्या खांद्यावरही
कुणाची मान विसावू पाहते
अखेर आधार ह्या शब्दाचाच आपण आधार घेत असतो का?
जगण्यासाठी आधाराची इतकी गरज असते का?

शनिवार, १९ जून, २०१०

पक्षांचे ठसे - सुधीर मोघे ( 'पक्षांचे ठसे' ह्या काव्यसंग्रहातून)

सुधीर मोघ्यांच्या कवितेशी माझी ओळख झाली ती त्यांच्या 'पक्षांचे ठसे' ह्या कवितेमुळे माझे कॉलेज नुकतेच संपले होते. पूर्वी सतत ज्या मित्र मैत्रिणीच्या गराड्यात दिवस जायचा ते आम्ही सर्व आपापल्या नोकरी-धंद्यात व्यग्र झालो. पण त्या मुक्त, मुग्ध, आशावादी, सोनेरी दिवसांच्या आठवणी मनात ताज्या होत्या आणि त्याच सुमारास हि कविता माझ्या वाचनात आली आणि मनात घर करून गेली....


कुठून कुठून येतात पक्षी
आणि आभाळ भरून जातं
सोनेरी नादांची भरजरी नक्षी
आभाळ दिमाखात मिरवीत रहातं

त्या पक्षांना न नाव-गावं
रेषांत गवसणार रूपही नसतं
रंगाचा, स्वरांचा धूसर कल्लोळ
एवढंच त्यांचं अस्तित्व भासतं

क्षणाच्या संगतीची जीवघेणी भूल
कण-कण व्यापून टाकते
एरवीची सावध शहाणी जाण
खुळ्या आवर्तात विरघळून जाते

स्वप्नात स्वप्न दिसावं तसं
क्षणात सारं घडतं, संपतं
खिन्न, रित्या प्राणांनी आभाळ
तोल तोल सांभाळत रहातं

शनिवार, १२ जून, २०१०

कधी वाटतं - निवेदिता पटवर्धन

कितीतरी मोठ्या मोठ्या कवींच्या किती तरी छान छान कवितांची नोंद अजून बाकी असताना मी माझीच कविता निवडण्याचे कारण म्हणजे हा शुक्रवार-शनिवार इतके कार्यक्रम होते कि फार काही लिहायला वेळच नव्हता. पण आता दर शनिवारी एका कवितेची नोंद करायचीच असे ठरवले असल्यामुळे माझीच कविता निवडली.

माझ्या एका मैत्रिणीच्या म्हणजे चित्रा भावेच्या भावाने म्हणजे डॉ. भूषण केळकरने अनिवासी भारतीयांच्या कवितांचा 'निवडक तीन' असा एक कवितासंग्रह प्रकाशित केला होता. त्यात माझ्याही तीन कवितांची निवड झाली होती. हि कविता त्यातलीच एक...

कधी वाटतं पाण्यासारखं व्हावं
मिळेल त्या रंगत मिसळून जावं
प्रसंगी बर्फ होऊन खंबीर बनावं
तर कधी वाफेसारखं सर्वांत सामावून जावं!

कधी वाटतं हवेसारखं व्हावं
सर्व व्योमात व्यापून उरावं
मोजमाप सोडून अनमोल व्हावं
अनमोल होऊनही बिनमोलात उपलब्ध व्हावं!

कधी वाटतं आकाशासारखा व्हावं
सर्वांवर प्रेमाचं पांघरूण घालावं
विजेसारखं चमकून धाकात ठेवावं
पाऊस होऊन कधी मायेने बरसावं!

शनिवार, ५ जून, २०१०

अनामी कवीची निनावी कविता

मला अगदी शाळा-कॉलेज मध्ये असल्यापासून कवितांची आवड होती. तेव्हा मी एक वही केली होती. तिला 'मुक्तविचारधारा' असे नाव हि दिले होते. कुठेही काही चांगले वाचले कि मी ह्या वहीत त्याची नोंद करून ठेवायचे. पण कधी कधी त्याबरोबर बाकीचे संदर्भ नाही लिहिले गेले... त्यामुळे हि कविता मला कुठे मिळाली, ती कोणाची आहे हे काहीही मला माहिती नाहीये... (कोणाला जर त्याबद्दल काही माहिती असेल तर कृपया मला कळवावे. )


हि कविता मला खूपच आवडते. सगळ्यात आवडती ओळ शेवटची.

प्रत्येकाची गती निराळी
प्रत्येकाचा पण तालहि तोच
प्रत्येकाचा नाजूक नखरा,
प्रत्येकाचा गहिरा खोच,
प्रत्येकाची रीत निराळी,
प्रत्येकाचे वळणही न्यारे,
प्रत्येकाने, प्रत्येकाच्या प्रत्येकातून जावे कारे?


किती खरं आहे हे... कितीही जवळचे व रक्ताचे नाते असले तरी प्रत्येकाचे स्वतःचे असे एक विश्व असतेच आणि ते असावेही...

सोमवार, ३१ मे, २०१०

माझ्या जीवा - बहिणाबाई चौधरी ( 'बहिणाईची गाणी' ह्या काव्यसंग्रहातून)

जीव देवानं धाडला
जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं
मौत म्हणे 'गेला गेला'

दीस गेला कामामधी
रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता
जलमाची जाग आली

नही सरलं सरलं
जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीन

आला सास, गेला सास
जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं
एका सासाचं अंतर!

येरे येरे माझ्या जीवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीच रूप

ऐक ऐक माझ्या जीवा
पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात
त्याच ऐक रे म्हनन

अरे निमानतोंडयाच्या
वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा
संसाराचा झालझेंडा

हास हास माझ्या जीवा
असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या
तोंडावर्हे काय फास

जग जग माझ्या जीवा
असा जगणं तोलाच
उच्च गगनासारख
धरीत्रीच्या रे मोलाचं

शनिवार, २९ मे, २०१०

माझी माय सरसोती - बहिणाबाई चौधरी ( 'बहिणाईची गाणी' ह्या काव्यसंग्रहातून)

निसर्गकन्या बहीणाबाईबद्दल कितीही बोललं आणि लिहील तरी ते कमीच वाटेल. निरक्षर आणि अशिक्षित असूनही त्यांची प्रतिभा, त्यांचे जीवनाविषयीचे तत्वज्ञान, त्यांची भक्ती आणि हे सर्व अतिशय साध्या, सोप्या बोली भाषेत मांडण्यावरचे त्यांचे प्रभुत्व पाहून मन मोहित तर होतेच पण बहीणाबाईबद्दल खूप आदर व आपुलकीही वाटते. बऱ्याच मान्यवरांनी त्यांच्याबद्दल, त्यांच्या कविताबद्दल खूप काही लिहून ठेवले आहे. 'बहीणाईची गाणी' ह्या पुस्तकासाठी आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून....

रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपधिक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता 'माय भिमाई माउली, जशी आंब्याची साउली' किंवा 'माझ्या माहेरची वाट, माले वाटे मखमल' असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते?.... बहीणाईच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी-बियाणे कसे प्रकट होते ह्याचे त्यांनी केलेले वर्णन वाचा.

ऊन वाऱ्याशी खेयता
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पान
जसे हात जोडीसन
टाया वाजवती पान
दंग देवाच्या भजनी


'तानक्या सोपानाला' हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाई शेताला निघाल्या कि काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लहडलेले हिरवे वडाचे झाड दिसले कि लागले ते त्यांच्या ओठांवर नाचायला:

हिरवी हिरवी पान
लाल फळ जशी चोच
आले वडाच्या झाडाला
जस पीक पोपटाच...


खळ्यात बैलाची पात सुरु झाली आणि मेढ्याभोवती बैल गरा गरा फिरू लागला कि लागलेच ते त्या बैलाला गोंजारायला:

पाय उचल रे बैला
कर बापा आता घाई
चालू दे रे रगडन
तुझ्या पायाची पुण्याई


उपणणीच्या वेळी वारयाने यावयाला जरा उशीर केला कि त्याने मारलीच त्याला हाक:

चाल ये रे ये रे वाऱ्या
ये रे मारोतीच्या बाप्या
नको देऊ रे गुंगारा
पुऱ्या झाल्या तुझ्या थापा!


शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे, पण जीवनाबद्दल कृतज्ञता बाळगून शेतकऱ्याने पंढरीच्या विठ्ठलावर भरीभार ठेवावा असे त्यांचे सांगणे होते.

शेतामधी गये घाम
हाडं मोडीसनी
आता घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी ....


अशा रीतीने महाराष्ट्रातील भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकर्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहीणाईच्या ह्या गाण्यांतून प्रकट झालेले आढळून येईल. मात्र, बहीणाईच्या काव्याचे एवढेच वैशिष्ठ्य नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान्याची किंवा महाकवींची प्रतिभाच जणू काही त्यांना प्राप्त झालेली होती....
गडकरी आणि कोल्हटकर ह्यांच्यासारख्या प्रगल्भ विनोदपंडितांना शोभेल असला कोटिबाज आणि उपरोधिक विनोद बहीणाईनी आपल्या काव्यात सहज केलेला आहे.

भाऊ 'घमा' गाळी घाम
'गणा' भगतगणात


ही शब्दांची मौज जाता जाता त्या साधू शकतात. तथापि, ज्यातून पीठ 'येते' त्याला 'जाते' का म्हणतात, जो जमिनीत 'ऊभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्या दिवसाला 'पाडवा' का म्हणतात ही बहीणाईची विनोदी पृच्छा मार्मिक नाही असे कोण म्हणेल? विचारांचा आणि वर्णनाचा विनोद करण्यातही त्यांचा चांगलाच हातखंडा होता...

नाव ठेवी अवघ्याले
करी सर्वांची नक्कल
हासवता हासवता
शिकवते रे अक्कल!


माणसाना हसवून शहाणे करावयाचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. बहीणाईने विनोदाचे हे सामर्थ्य ओळखलेले होते...
रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहीणाईचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामांच्या दृष्टीने फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे.
रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे असे माझे मत आहे. 'अशी कशी वेडी ग माये' पेक्षा 'अशी कशी येळी व माये' किंवा 'पाणी लौकीच नितळ | त्याला अमृताची गोडी' ह्यापेक्षा 'पानी लौकीच नित्तय | त्याले अम्रीताची गोडी' ह्या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो. एखादे गोजिरवाणे बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो, तसे बहिणाईचे काव्य वाचताना मनाला नि कानाला वाटते. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे....


'माझी माय सरसोती ' ह्या त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान मांडले आहे... ते त्यांना कसे व कोण सुचवते हे हि सांगितले आहे... शिवाय त्याचा आणि त्यांच्या भक्तीचा त्यांच्या जीवनाशी कसा संबध आहे हे हि दाखवून दिले आहे....



माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीत पेरली!

माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता- भागवत
पावसात समावत
माटीमधी उगवत!

अरे देवाचं दर्सन
झालं झालं आपसूक
हिरीदात सुर्यबापा
दाये अरूपाच रूप!

तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानामंधी
देवा तुझं येनजान
वारा सांगे कानामंधी!

फुलामधी समावला
धरित्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय?

किती रंगवीशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग
रंग खेये आभायात.

धर्ती मधल्या रसान
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते.

शनिवार, २२ मे, २०१०

पुतळा - विं. दा. करंदीकर (विरूपिका ह्या काव्यसंग्रहातून)

ही कविता खर तर खूप काही सांगून जाते. माझ्या अल्पमतीला जे जाणवले ते असे..
रोजच्या आयुष्यात आपल्याला कितीतरी वेळा आपले एक देखाव्याचे रूप तयार करावे लागते... आणि कधी कधी हे देखाव्याचेच रूप आपण इतक्यावेळा वापरतो कि शेवटी हे रूप म्हणजेच आपण बनून जातो व खऱ्या आपल्याला असेच पुतळा बनून राहावे लागते. इथे पुतळा बनून म्हणजे दगडासारखे, निर्जीव व संवेदनाहीन असेही अभिप्रेत असू शकते...



माझ्याच उंचीचा एका पुतळा,
माझेच नाक,
माझेच डोळे,
आणि छाताड पुढे झुकवण्याची पद्धतही माझीच.

त्या तोतयाला मी माझे कपडे चढवले.
पैटची बटणे लावली,
डोक्यावर टोपी ठेवली.
हातामध्ये काठी दिली.
आणि मग जोडासुद्धा त्याच्या पायापुढे नीट मांडून
मी सर्वस्वी विधीमुक्त झालो. हसलो.

माझा जोड पायात घालून तो झपाझप निघून गेला.

शेवटी अटळ ते करावेच लागते :
त्याच्या चबुतऱ्यावर मी मक्खपणे उभा राहिलो.

असा मी... तसा मी... - विं. दा. करंदीकर (मृदगंध ह्या काव्यसंग्रहातून)

विं. दा. करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर २३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०
विंदा कवी तर होतेच शिवाय ते एक लघुनिबंधकार, समीक्षक व भाषांतरकारही होते. त्यांनी इंग्रजीतही कविता लेखन केले आहे. तसेच त्यांच्या बालकावितांचेही कितीतरी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत... त्यांना साहित्यातील सर्वोच्य समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. या शिवाय 'केशवसुत सम्मान', 'Soviet Land Nehru Literary Award', 'कबीर सम्मान', 'साहित्य अकादमीची fellowship' अशा इतरही काही पुरस्कारांनी नावाजण्यात आले होते.

नवकविता ही मराठी कवितेच्या विकासातील एक महत्वाची आणि क्रांतीसदृश घटना; केशवसुत ते कुसुमाग्रज या कालखंडातील रोमांटीक कवितेपासून अलग होऊन आपले मुल्यगर्भ वेगळेपण सिद्ध करणारी व नवी अभिरुची घडवणारी. या नव्या उलता-पालथित करंदीकरानि केलेले कार्य मोठे आहे. आशयाच्या किंवा घाटाच्या बाबतीत कसलाही साचा पुढे न ठेवता, जाणीवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनासाठी अस्वस्थ होणारी, ज्ञान-विज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर सामाजिक वास्तवाला भिडू पाहणारी, विचार भावना व संवेदना यांचा संमिश्र वेध घेणारी, अशी ही कविता एकाच वेळी गहन सांस्कृतिक संदर्भांना आत्मसात करते आणि रूढ संकेतांना धुडकावून लावते. तिच्यातील रांगडा जोमदारपणा, खोल चिंतनशीलता आणि मर्मभेदक उपहास रसिकांच्या हृदयाला तसाच डोक्यालाही जाऊन भिडतो. तिचा फटकळपणा आणि रोखठोकपण बोचला तरी हवाहवासा वाटतो; कारण मूलतः माणसावरील अपार प्रेमातूनच तो जन्माला आलेला असतो. करंदीकरांच्या कवितेची फिरत इतकी विविध व विलक्षण आहे कि तिचे यथार्थ दर्शन घडवणे हे एक आव्हानच आहे....
'संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता' ह्या पुस्तकातून.


कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला; कधी आपणाला स्वहस्तेच शापी ||
कधी याचितो सत, कधी स्वप्नं याची; कधी धावतो काळ टाकुनी मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन; कधी मृत्यूची भाबडी भीक मागे ||
कधी दैन्यवाणा, निराधार होई; कधी गूढ, गंभीर आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने; कधी कापतो बोलता आपणांशी ||
कधी आपणा सर्व पिंडात शोधी; कधी पाहतो आत्मरुपात सारे
कधी मोजितो आपणाला अनंते; अणुरूप होती जिथे सूर्य तारे ||
टळेना अहंकार साध्या कृतीचा; गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतींचे
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे; कधी सत्य ते वाटते सोंग साचे ||
कधी संयमी, संशयात्मा, विरागी; कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी.... कसा मी कळेना.... स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी!

शनिवार, १५ मे, २०१०

हायकू - शिरीष पै

हायकू हा एक जपानी काव्य-प्रकार आहे... ५ ते ७ शब्दांच्या ३ ओळी.... पहिल्या व तिसऱ्या ओळीत किंवा दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत यमक जुळते.... आणि यात निसर्गातील एखादा प्रसंग प्रतीत केलेला असतो... हा झाला प्रार्थमिक आराखडा.... खरा हायकू कसा असतो/असावा हे शिरीष पै नीच त्यांच्या 'मी माझे मला' ह्या पुस्तकात लिहिले आहे...

निसर्गात सारखं काहीतरी घडत असतं. जसं आपल्या मनात एकसारखं काहीतरी घडत असतं. पण निसर्गातली एखादीच घटना मनातल्या विचारांचा प्रवाह क्षणार्धात थांबवते. विचार थांबतात तेव्हा रिकाम्या पडलेल्या मनाच्या पोकळीत ते पाहिलेलं दृश्य येऊन बसते. मनात कुठं तरी, काहीतरी, केव्हाचं तरी किंवा आताच तरी जाग होत. मनात स्थिर झालेलं ते चित्र शब्द शोधू लागतं. शब्दमय होऊ पहात. ही सगळी ह्या मनाची क्रीडा आहे. एक नेमकं हायकू- दृश्य टिपणं, त्यात स्वतःला बेमालूम मिसळून टाकणं, त्यात स्वतःला नष्ट करून टाकणं आणि मग शब्दातून केवळ दृश्य होऊन उरणं. मन थांबत, संपतं, भूतकाळ-भविष्यकाळ दूर सारून वर्तमान होतं, तेव्हाच हायकू निर्माण होतो....
बघताना मी भूतकाळात नाही, भाविशाकालात नाही. मी आहे आताच्या क्षणात. हे माझं आता असणं आणि फक्त असणं- हे जणू साऱ्या बंधनातून मुक्त होणं आहे. ह्या आता असण्यातच 'हायकू' पण आहे. हायकू लिहितेय तेव्हा मी हे आता असणंच शब्दातून पकडून ठेवतेय. मग नंतर कुणी तरी जेव्हा तो हायकू वाचेल तो ह्या आताच असेल.....

हायकू मला आवडतात ते त्यांच्या साध्या सोप्या मांडणीमुळे आणि तरीही अतिशय गहिरा, गंभीर विचार देण्याच्या त्यांच्या ताकदीमुळे.... मराठीमध्ये अजूनही कोणी हायकू लिहिले असतीलच पण मी तरी अजूनपर्यंत फक्त शिरीष पै चेच हायकू वाचलेत... अतिशय तरल आणि प्रभावशाली हायकू आहेत त्यांचे... त्यापैकी मी वाचलेले आणि मला आवडलेले काही...

एक तळ... जुनाट... स्तब्ध
एक बेडूक बुडी घेतो त्यांत
जराशी खळबळ आणि पुन्हा शांत

किती वेळा आपण अनुभवले असेल कि एरवी शांत आयुष्यात एखादी घटना / विचार / बातमी एकदम खळबळ उडवून देते आणि यथावकाश पुन्हा सर्व सुरळीत चालू होत...

इतक्या वेगाने गाडी पुढं गेली
रस्त्यावर उमललेली रानफुलं
डोळे भरून पहातही नाही आली
खरच... किती गोष्टींचा आपण आनंदच घेत नाही... नुसतेच कशाच्या तरी मागे पळत राहतो...

पायापाशी फुटली लाट
पाणी आले... गेले
मी... फक्त पहात राहिले
दुसरे आपण फार काही करूही शकत नाही....

उदास झालेलं माझ मन
इतकं प्रसन्न कसं झालं
साधं पाखरू तर बागेत चिवचिवल


उडत जाताना बगळ्यान
किंचित स्पर्श केला पाण्याला
उठलेला तरंग वाढतच गेला

शनिवार, ८ मे, २०१०

एकटेपणा - अनिल

हि कविता टाकल्याशिवाय मला चैनच पडत नाहीये... अतिशय सुंदर कविता आहे हि... सुंदर कल्पना....

जपते आहे तुला, तितकीच एकटेपणाला
देता येत नाही तुला, ते सार देतेय एकटेपणाला
एकटेपणा जर माझ्यापाशी नसता
तर कशी सहन केली असती तुझी दूरता
लोक समजतात तो एकटेपणा हा नव्हे
धबधब्यासारखा जो माझ्यावर कोसळतो आहे
एकटेपणाने शिकवलं आहे मला
कि एकट दरवळत बसता येत मला
इतक दिलंयस तू कि मोजता येणार नाही
पण तू दिलेल्या एकटेपणाची सर कशालाच नाही...

शुक्रवार, ७ मे, २०१०

तळ्याकाठी - अनिल

धन्यवाद! बऱ्याच लोकांनी email मधून माझ्या कल्पनेला दाद दिली व मला प्रोत्साहन दिले त्याबद्दल मनापासून आभार... माझ्याबरोबरच बऱ्याच लोकांच्या कवितेच्या छंदाला माझ्या blog मुळे हवा लागणार आहे असे कळल्याने एकदम हुरूपहि आला... थोडी जवाबदारीही वाढल्यासारखी वाटली; पण एकंदरीत खूप बरे वाटले कि मी हा blog लिहायचे मनावर घेतले....
ह्या आठवड्यामध्ये कोणाची व कोणती कविता निवडावी ह्यावर खूप विचार केला.... त्या निमित्ताने कितीतरी कविता मनात आल्या, वाचल्या गेल्या.... शेवटी निवडली अनिलांची 'दशपदी'...
'दशपदी म्हणजे दहा ओळींची कविता.... हि दशपदी लांबीने लहान; यमकांच्या साखळीने ती एकत्र बांधली जात नाही. कारण तशा त्या पाच स्वतंत्र द्विपद्या असतात. तिची एकात्मता अंतर्गत असते. भाववृत्तीचे एकाग्र चित्रण करणाऱ्या या आटोपशीर कवितांत निसर्गाचा तपशील असला तरी तो वृत्तीच्या अंकित असतो, आणि या वृत्तीचा उच्चारही अति-संयमित असतो...' मंगेश राजाध्यक्ष यांनी अनिलांच्या 'सांगाती' या काव्यसंग्रहासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून....
मी वाचलेल्या दशपद्यांपैकी मला भावलेल्या दशपद्या म्हणजे 'एक दिवस', 'एकटेपणा', 'आणीबाणी', ' पावसाळी सांज' व 'तळ्याकाठी'.... एकेक करून मी ह्या सगळ्यांची नोंद यथावकाश करीनच पण आजची कविता 'तळ्याकाठी'...

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वःताच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवित कापरे जलवलये उडवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा ठाव वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपऱ्यांत एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते!


ह्यातली काही काही यमके थोडी खटकतात म्हणजे नीट जुळून आल्यासारखी वाटत नाहीत... पण मला एकंदरीत कविता व कवितेचा विषय आवडला... एक छान शब्दचित्र तयार होते मनासमोर.... शेवटच्या दोन ओळी मला सगळ्यात जास्ती आवडल्या व भावल्या...

शनिवार, १ मे, २०१०

प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन

आजची कविता: प्रेमस्वरूप आई... कवी: माधव ज्युलियन

हि कविता निवडण्याचे पहिले कारण म्हणजे माझ्या आईला श्रद्धांजली... माझे हे साहित्यप्रेम मला माझ्या आईकडून मिळाले. तिलाही वाचनाची व लिखाणाची खूप आवड होती. त्यामुळे हा Blog मी तिला व तिच्या आठवणीना समर्पित करते... आता दुसरे कारण म्हणजे हि कविता खूप आर्त आहे. अगदी शाळेत असताना मी जेव्हा हि कविता पहिल्यांदी वाचली तेव्हाही मला ती आर्तता भिडली होती... आईबद्दलचे इतके उत्कट प्रेम, ती तडप, कदाचितच दुसऱ्या काही रुपात प्रदर्शित झाली असेल... अशा ह्या सुंदर कवितेला वसंत प्रभूंनी सुंदर चाल देऊन व लता मंगेशकरांच्या आवाजाने अजरामर केले आहे...

प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई
बोलावू तूज आता मी कोणत्या उपायी

नाही जगात झाली, आबाळ या जीवाची
तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची
चित्ती तुझी स्मरेना काहीच रुपरेखा
आई हवी म्हणोनी सोडी न जीव हेका

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुजांचे वात्सल्य लोचनाही
वाटे इथूनी जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
देईल शांतवाया हृस्पंद मंद झोके
घे जन्म तू फिरुनी येईन मी ही पोटी
खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी

कल्पना

उद्देश: मला कविता वाचायला नेहमीच आवडतात. मोजक्या शब्दात खूप काही सांगायची ताकद शिवाय वाचकाला त्यात सतत काही नवा अर्थ शोधण्याची व सापडण्याची शक्यता ह्या गोष्टींमुळे मला कविता भावते. कविता वाचू लागले कि मी एका वेगळ्या माझ्या आवडत्या विश्वात रमते हे खरे असले तरी नेहमीच्या घाईगर्दीच्या जगात कविता वाचण खूप कमी होऊ लागलंय.... खरतर करमणुकीसाठी TV बघणे वाढल्यामुळेपण असं होतंय... तेव्हा आज माझ्या डोक्यात विचार आला कि आपण एक Blog लिहावा व जगजाहीरच करावं कि आपण दर आठवड्याला त्यात एक कविता लिहिणार आहोत. त्या निमित्ताने माझ्यावर थोडा दबावही राहील. (जे लोकं मला ओळखतात त्यांना माहिती आहे कि दबाव नसेल तर माझे हे काम मागेपाडून मी आणखीन काही नवीन करायला घेतले असेन... असो.. ) शिवाय Blog चा फायदा म्हणजे माझ्या सारख्याच आणखी काही कविता प्रेमींशीही ह्या निमित्ताने संवाद साधता येईल... आणि माझ्या ह्या प्रयोगाला सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रदिनासारखा सुंदर मुहूर्त मिळाला हा तर खरच एक छान सुयोग म्हणायचा... तर आता माझी हि प्रस्तावना थांबवते व आजच्या कवितेकडे वळते...