सोमवार, ३१ मे, २०१०
माझ्या जीवा - बहिणाबाई चौधरी ( 'बहिणाईची गाणी' ह्या काव्यसंग्रहातून)
जल्म म्हणे 'आला आला'
जव्हा आलं बोलावणं
मौत म्हणे 'गेला गेला'
दीस गेला कामामधी
रात नीजमधी गेली
मरणाची नीज जाता
जलमाची जाग आली
नही सरलं सरलं
जीव तुझ येन जान
जसा घडला मुक्काम
त्याले म्हनती रे जीन
आला सास, गेला सास
जीव तुझं रे तंतर
अरे जगणं-मरणं
एका सासाचं अंतर!
येरे येरे माझ्या जीवा
काम पडलं अमाप
काम करता करता
देख देवाजीच रूप
ऐक ऐक माझ्या जीवा
पीडयेलाच कण्हणं?
देरे गांजल्याले हात
त्याच ऐक रे म्हनन
अरे निमानतोंडयाच्या
वढ पाठीवर्हे धांडा
नाच नाच माझ्या जीवा
संसाराचा झालझेंडा
हास हास माझ्या जीवा
असा संसारात हास
इडा पीडा संकटाच्या
तोंडावर्हे काय फास
जग जग माझ्या जीवा
असा जगणं तोलाच
उच्च गगनासारख
धरीत्रीच्या रे मोलाचं

शनिवार, २९ मे, २०१०
माझी माय सरसोती - बहिणाबाई चौधरी ( 'बहिणाईची गाणी' ह्या काव्यसंग्रहातून)
रोजचे घरातले आणि शेतामधले काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक अपधिक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता 'माय भिमाई माउली, जशी आंब्याची साउली' किंवा 'माझ्या माहेरची वाट, माले वाटे मखमल' असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते?.... बहीणाईच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी-बियाणे कसे प्रकट होते ह्याचे त्यांनी केलेले वर्णन वाचा.ऊन वाऱ्याशी खेयता
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पान
जसे हात जोडीसन
टाया वाजवती पान
दंग देवाच्या भजनी
'तानक्या सोपानाला' हाऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाई शेताला निघाल्या कि काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लहडलेले हिरवे वडाचे झाड दिसले कि लागले ते त्यांच्या ओठांवर नाचायला:हिरवी हिरवी पान
लाल फळ जशी चोच
आले वडाच्या झाडाला
जस पीक पोपटाच...
खळ्यात बैलाची पात सुरु झाली आणि मेढ्याभोवती बैल गरा गरा फिरू लागला कि लागलेच ते त्या बैलाला गोंजारायला:पाय उचल रे बैला
कर बापा आता घाई
चालू दे रे रगडन
तुझ्या पायाची पुण्याई
उपणणीच्या वेळी वारयाने यावयाला जरा उशीर केला कि त्याने मारलीच त्याला हाक:चाल ये रे ये रे वाऱ्या
ये रे मारोतीच्या बाप्या
नको देऊ रे गुंगारा
पुऱ्या झाल्या तुझ्या थापा!
शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे, पण जीवनाबद्दल कृतज्ञता बाळगून शेतकऱ्याने पंढरीच्या विठ्ठलावर भरीभार ठेवावा असे त्यांचे सांगणे होते.शेतामधी गये घाम
हाडं मोडीसनी
आता घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी ....
अशा रीतीने महाराष्ट्रातील भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकर्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहीणाईच्या ह्या गाण्यांतून प्रकट झालेले आढळून येईल. मात्र, बहीणाईच्या काव्याचे एवढेच वैशिष्ठ्य नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान्याची किंवा महाकवींची प्रतिभाच जणू काही त्यांना प्राप्त झालेली होती....
गडकरी आणि कोल्हटकर ह्यांच्यासारख्या प्रगल्भ विनोदपंडितांना शोभेल असला कोटिबाज आणि उपरोधिक विनोद बहीणाईनी आपल्या काव्यात सहज केलेला आहे.भाऊ 'घमा' गाळी घाम
'गणा' भगतगणात
ही शब्दांची मौज जाता जाता त्या साधू शकतात. तथापि, ज्यातून पीठ 'येते' त्याला 'जाते' का म्हणतात, जो जमिनीत 'ऊभा' आहे त्याला 'आड' का म्हणतात किंवा ज्या दिवशी आपण गुढी 'उभारतो' त्या दिवसाला 'पाडवा' का म्हणतात ही बहीणाईची विनोदी पृच्छा मार्मिक नाही असे कोण म्हणेल? विचारांचा आणि वर्णनाचा विनोद करण्यातही त्यांचा चांगलाच हातखंडा होता...नाव ठेवी अवघ्याले
करी सर्वांची नक्कल
हासवता हासवता
शिकवते रे अक्कल!
माणसाना हसवून शहाणे करावयाचे हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. बहीणाईने विनोदाचे हे सामर्थ्य ओळखलेले होते...
रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहीणाईचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामांच्या दृष्टीने फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे.
रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे असे माझे मत आहे. 'अशी कशी वेडी ग माये' पेक्षा 'अशी कशी येळी व माये' किंवा 'पाणी लौकीच नितळ | त्याला अमृताची गोडी' ह्यापेक्षा 'पानी लौकीच नित्तय | त्याले अम्रीताची गोडी' ह्या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो. एखादे गोजिरवाणे बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो, तसे बहिणाईचे काव्य वाचताना मनाला नि कानाला वाटते. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे....
'माझी माय सरसोती ' ह्या त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान मांडले आहे... ते त्यांना कसे व कोण सुचवते हे हि सांगितले आहे... शिवाय त्याचा आणि त्यांच्या भक्तीचा त्यांच्या जीवनाशी कसा संबध आहे हे हि दाखवून दिले आहे....
माझी माय सरसोती
माले शिकवते बोली
लेक बहिनाच्या मनी
किती गुपीत पेरली!
माझ्यासाठी पांडुरंगा
तुझं गीता- भागवत
पावसात समावत
माटीमधी उगवत!
अरे देवाचं दर्सन
झालं झालं आपसूक
हिरीदात सुर्यबापा
दाये अरूपाच रूप!
तुझ्या पायाची चाहूल
लागे पानापानामंधी
देवा तुझं येनजान
वारा सांगे कानामंधी!
फुलामधी समावला
धरित्रीचा परमय
माझ्या नाकाले इचारा
नथनीले त्याचं काय?
किती रंगवीशी रंग
रंग भरले डोयात
माझ्यासाठी शिरिरंग
रंग खेये आभायात.
धर्ती मधल्या रसान
जीभ माझी सवादते
तव्हा तोंडातली चव
पिंडामधी ठाव घेते.

शनिवार, २२ मे, २०१०
पुतळा - विं. दा. करंदीकर (विरूपिका ह्या काव्यसंग्रहातून)
रोजच्या आयुष्यात आपल्याला कितीतरी वेळा आपले एक देखाव्याचे रूप तयार करावे लागते... आणि कधी कधी हे देखाव्याचेच रूप आपण इतक्यावेळा वापरतो कि शेवटी हे रूप म्हणजेच आपण बनून जातो व खऱ्या आपल्याला असेच पुतळा बनून राहावे लागते. इथे पुतळा बनून म्हणजे दगडासारखे, निर्जीव व संवेदनाहीन असेही अभिप्रेत असू शकते...
माझ्याच उंचीचा एका पुतळा,
माझेच नाक,
माझेच डोळे,
आणि छाताड पुढे झुकवण्याची पद्धतही माझीच.
त्या तोतयाला मी माझे कपडे चढवले.
पैटची बटणे लावली,
डोक्यावर टोपी ठेवली.
हातामध्ये काठी दिली.
आणि मग जोडासुद्धा त्याच्या पायापुढे नीट मांडून
मी सर्वस्वी विधीमुक्त झालो. हसलो.
माझा जोड पायात घालून तो झपाझप निघून गेला.
शेवटी अटळ ते करावेच लागते :
त्याच्या चबुतऱ्यावर मी मक्खपणे उभा राहिलो.

असा मी... तसा मी... - विं. दा. करंदीकर (मृदगंध ह्या काव्यसंग्रहातून)
विंदा कवी तर होतेच शिवाय ते एक लघुनिबंधकार, समीक्षक व भाषांतरकारही होते. त्यांनी इंग्रजीतही कविता लेखन केले आहे. तसेच त्यांच्या बालकावितांचेही कितीतरी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत... त्यांना साहित्यातील सर्वोच्य समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. या शिवाय 'केशवसुत सम्मान', 'Soviet Land Nehru Literary Award', 'कबीर सम्मान', 'साहित्य अकादमीची fellowship' अशा इतरही काही पुरस्कारांनी नावाजण्यात आले होते.
नवकविता ही मराठी कवितेच्या विकासातील एक महत्वाची आणि क्रांतीसदृश घटना; केशवसुत ते कुसुमाग्रज या कालखंडातील रोमांटीक कवितेपासून अलग होऊन आपले मुल्यगर्भ वेगळेपण सिद्ध करणारी व नवी अभिरुची घडवणारी. या नव्या उलता-पालथित करंदीकरानि केलेले कार्य मोठे आहे. आशयाच्या किंवा घाटाच्या बाबतीत कसलाही साचा पुढे न ठेवता, जाणीवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनासाठी अस्वस्थ होणारी, ज्ञान-विज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर सामाजिक वास्तवाला भिडू पाहणारी, विचार भावना व संवेदना यांचा संमिश्र वेध घेणारी, अशी ही कविता एकाच वेळी गहन सांस्कृतिक संदर्भांना आत्मसात करते आणि रूढ संकेतांना धुडकावून लावते. तिच्यातील रांगडा जोमदारपणा, खोल चिंतनशीलता आणि मर्मभेदक उपहास रसिकांच्या हृदयाला तसाच डोक्यालाही जाऊन भिडतो. तिचा फटकळपणा आणि रोखठोकपण बोचला तरी हवाहवासा वाटतो; कारण मूलतः माणसावरील अपार प्रेमातूनच तो जन्माला आलेला असतो. करंदीकरांच्या कवितेची फिरत इतकी विविध व विलक्षण आहे कि तिचे यथार्थ दर्शन घडवणे हे एक आव्हानच आहे....
'संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता' ह्या पुस्तकातून.
कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची; कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला; कधी आपणाला स्वहस्तेच शापी ||
कधी याचितो सत, कधी स्वप्नं याची; कधी धावतो काळ टाकुनी मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन; कधी मृत्यूची भाबडी भीक मागे ||
कधी दैन्यवाणा, निराधार होई; कधी गूढ, गंभीर आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने; कधी कापतो बोलता आपणांशी ||
कधी आपणा सर्व पिंडात शोधी; कधी पाहतो आत्मरुपात सारे
कधी मोजितो आपणाला अनंते; अणुरूप होती जिथे सूर्य तारे ||
टळेना अहंकार साध्या कृतीचा; गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतींचे
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे; कधी सत्य ते वाटते सोंग साचे ||
कधी संयमी, संशयात्मा, विरागी; कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी.... कसा मी कळेना.... स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी!

शनिवार, १५ मे, २०१०
हायकू - शिरीष पै
निसर्गात सारखं काहीतरी घडत असतं. जसं आपल्या मनात एकसारखं काहीतरी घडत असतं. पण निसर्गातली एखादीच घटना मनातल्या विचारांचा प्रवाह क्षणार्धात थांबवते. विचार थांबतात तेव्हा रिकाम्या पडलेल्या मनाच्या पोकळीत ते पाहिलेलं दृश्य येऊन बसते. मनात कुठं तरी, काहीतरी, केव्हाचं तरी किंवा आताच तरी जाग होत. मनात स्थिर झालेलं ते चित्र शब्द शोधू लागतं. शब्दमय होऊ पहात. ही सगळी ह्या मनाची क्रीडा आहे. एक नेमकं हायकू- दृश्य टिपणं, त्यात स्वतःला बेमालूम मिसळून टाकणं, त्यात स्वतःला नष्ट करून टाकणं आणि मग शब्दातून केवळ दृश्य होऊन उरणं. मन थांबत, संपतं, भूतकाळ-भविष्यकाळ दूर सारून वर्तमान होतं, तेव्हाच हायकू निर्माण होतो....
बघताना मी भूतकाळात नाही, भाविशाकालात नाही. मी आहे आताच्या क्षणात. हे माझं आता असणं आणि फक्त असणं- हे जणू साऱ्या बंधनातून मुक्त होणं आहे. ह्या आता असण्यातच 'हायकू' पण आहे. हायकू लिहितेय तेव्हा मी हे आता असणंच शब्दातून पकडून ठेवतेय. मग नंतर कुणी तरी जेव्हा तो हायकू वाचेल तो ह्या आताच असेल.....
हायकू मला आवडतात ते त्यांच्या साध्या सोप्या मांडणीमुळे आणि तरीही अतिशय गहिरा, गंभीर विचार देण्याच्या त्यांच्या ताकदीमुळे.... मराठीमध्ये अजूनही कोणी हायकू लिहिले असतीलच पण मी तरी अजूनपर्यंत फक्त शिरीष पै चेच हायकू वाचलेत... अतिशय तरल आणि प्रभावशाली हायकू आहेत त्यांचे... त्यापैकी मी वाचलेले आणि मला आवडलेले काही...
एक तळ... जुनाट... स्तब्ध
एक बेडूक बुडी घेतो त्यांत
जराशी खळबळ आणि पुन्हा शांत
किती वेळा आपण अनुभवले असेल कि एरवी शांत आयुष्यात एखादी घटना / विचार / बातमी एकदम खळबळ उडवून देते आणि यथावकाश पुन्हा सर्व सुरळीत चालू होत...
इतक्या वेगाने गाडी पुढं गेलीखरच... किती गोष्टींचा आपण आनंदच घेत नाही... नुसतेच कशाच्या तरी मागे पळत राहतो...
रस्त्यावर उमललेली रानफुलं
डोळे भरून पहातही नाही आली
पायापाशी फुटली लाटदुसरे आपण फार काही करूही शकत नाही....
पाणी आले... गेले
मी... फक्त पहात राहिले
उदास झालेलं माझ मन
इतकं प्रसन्न कसं झालं
साधं पाखरू तर बागेत चिवचिवल
उडत जाताना बगळ्यान
किंचित स्पर्श केला पाण्याला
उठलेला तरंग वाढतच गेला

शनिवार, ८ मे, २०१०
एकटेपणा - अनिल
जपते आहे तुला, तितकीच एकटेपणाला
देता येत नाही तुला, ते सार देतेय एकटेपणाला
एकटेपणा जर माझ्यापाशी नसता
तर कशी सहन केली असती तुझी दूरता
लोक समजतात तो एकटेपणा हा नव्हे
धबधब्यासारखा जो माझ्यावर कोसळतो आहे
एकटेपणाने शिकवलं आहे मला
कि एकट दरवळत बसता येत मला
इतक दिलंयस तू कि मोजता येणार नाही
पण तू दिलेल्या एकटेपणाची सर कशालाच नाही...

शुक्रवार, ७ मे, २०१०
तळ्याकाठी - अनिल
ह्या आठवड्यामध्ये कोणाची व कोणती कविता निवडावी ह्यावर खूप विचार केला.... त्या निमित्ताने कितीतरी कविता मनात आल्या, वाचल्या गेल्या.... शेवटी निवडली अनिलांची 'दशपदी'...
'दशपदी म्हणजे दहा ओळींची कविता.... हि दशपदी लांबीने लहान; यमकांच्या साखळीने ती एकत्र बांधली जात नाही. कारण तशा त्या पाच स्वतंत्र द्विपद्या असतात. तिची एकात्मता अंतर्गत असते. भाववृत्तीचे एकाग्र चित्रण करणाऱ्या या आटोपशीर कवितांत निसर्गाचा तपशील असला तरी तो वृत्तीच्या अंकित असतो, आणि या वृत्तीचा उच्चारही अति-संयमित असतो...' मंगेश राजाध्यक्ष यांनी अनिलांच्या 'सांगाती' या काव्यसंग्रहासाठी लिहिलेल्या प्रस्तावनेमधून....मी वाचलेल्या दशपद्यांपैकी मला भावलेल्या दशपद्या म्हणजे 'एक दिवस', 'एकटेपणा', 'आणीबाणी', ' पावसाळी सांज' व 'तळ्याकाठी'.... एकेक करून मी ह्या सगळ्यांची नोंद यथावकाश करीनच पण आजची कविता 'तळ्याकाठी'...
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते
जिथे शांतता स्वःताच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही
गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवित कापरे जलवलये उडवून देत
उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा ठाव वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपऱ्यांत एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून रहावे मला वाटते!
ह्यातली काही काही यमके थोडी खटकतात म्हणजे नीट जुळून आल्यासारखी वाटत नाहीत... पण मला एकंदरीत कविता व कवितेचा विषय आवडला... एक छान शब्दचित्र तयार होते मनासमोर.... शेवटच्या दोन ओळी मला सगळ्यात जास्ती आवडल्या व भावल्या...

शनिवार, १ मे, २०१०
प्रेमस्वरूप आई - माधव ज्युलियन
आजची कविता: प्रेमस्वरूप आई... कवी: माधव ज्युलियन
हि कविता निवडण्याचे पहिले कारण म्हणजे माझ्या आईला श्रद्धांजली... माझे हे साहित्यप्रेम मला माझ्या आईकडून मिळाले. तिलाही वाचनाची व लिखाणाची खूप आवड होती. त्यामुळे हा Blog मी तिला व तिच्या आठवणीना समर्पित करते... आता दुसरे कारण म्हणजे हि कविता खूप आर्त आहे. अगदी शाळेत असताना मी जेव्हा हि कविता पहिल्यांदी वाचली तेव्हाही मला ती आर्तता भिडली होती... आईबद्दलचे इतके उत्कट प्रेम, ती तडप, कदाचितच दुसऱ्या काही रुपात प्रदर्शित झाली असेल... अशा ह्या सुंदर कवितेला वसंत प्रभूंनी सुंदर चाल देऊन व लता मंगेशकरांच्या आवाजाने अजरामर केले आहे...
प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई
बोलावू तूज आता मी कोणत्या उपायी
नाही जगात झाली, आबाळ या जीवाची
तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची
चित्ती तुझी स्मरेना काहीच रुपरेखा
आई हवी म्हणोनी सोडी न जीव हेका
ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुजांचे वात्सल्य लोचनाही
वाटे इथूनी जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे
वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके
देईल शांतवाया हृस्पंद मंद झोके
घे जन्म तू फिरुनी येईन मी ही पोटी
खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी

कल्पना
